You are currently viewing Who is Hinduja Family : ब्रिटनमधील हिंदुजा परिवार अडचणीत, नेमकं काय आहे प्रकरण?
Who is Hinduja Family

Who is Hinduja Family : ब्रिटनमधील हिंदुजा परिवार अडचणीत, नेमकं काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली : (Who is Hinduja Family) भारतीय वंशाचे अब्जाधीश आणि ब्रिटनचे सर्वात श्रीमंत हिंदुजा कुटुंब नोकरांच्या शोषणाच्या प्रकरणात दोषी आढळले आहे. या कुटुंबातील चार जणांना शुक्रवारी स्विस न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. उद्योगपती प्रकाश हिंदुजा आणि त्यांची पत्नी कमल हिंदुजा यांना साडेचार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर मुलगा अजय आणि सून नम्रता यांना चार वर्षांची शिक्षा झाली आहे.

हिंदुजा कुटुंबावर त्यांच्या स्वित्झर्लंड व्हिलामध्ये काम करणाऱ्या लोकांचे शोषण केल्याचा आरोप होता. त्यापैकी बहुतेक भारतातील निरक्षर लोक होते. तथापि, त्यांच्या कर्मचाऱ्यांना ते काय करत आहेत याची पुरेशी समज असल्याचे सांगत न्यायालयाने मानवी तस्करीचे आरोप फेटाळून लावले. निकालाच्या वेळी हिंदुजा कुटुंबातील चारही सदस्य न्यायालयात नव्हते. मात्र, त्यांचा व्यवस्थापक आणि पाचवा आरोपी नजीब झियाजी हजर होता. त्याला 18 महिन्यांची शिक्षाही झाली होती.

करार होऊनही कोर्टाने खटला बंद केला नाही

बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, हिंदुजा कुटुंबाने गेल्या आठवड्यात तक्रारकर्त्यांसोबत समझोता केला. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने खटला सुरू ठेवला. शिक्षा सुनावण्यापूर्वीच स्विस अधिकाऱ्यांनी हिरे, रुबी आणि प्लॅटिनम नेकलेससह हिंदुजा कुटुंबातील अनेक मालमत्ता जप्त केल्या होत्या. हे कायदेशीर खर्च आणि दंड भरण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

प्रकाश हिंदुजा 2007 मध्ये अशाच आरोपात दोषी आढळले होते. मात्र, त्यानंतरही त्यांनी योग्य कागदपत्रांशिवाय कर्मचारी भरती सुरूच ठेवली. हिंदुजा कुटुंबावर त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पासपोर्ट जप्त करणे, त्यांना स्विस फ्रँक्स ऐवजी रुपयात पैसे देणे, त्यांना व्हिला सोडण्यापासून रोखणे आणि स्वित्झर्लंडमध्ये अत्यंत कमी पगारावर त्यांना दीर्घकाळ काम करण्यास भाग पाडणे असे आरोप होते.

हिंदुजा यांच्या वकिलांनी या निर्णयावर अपील केल्याचे सांगितले. फोर्ब्सनुसार, आयटी, मीडिया, रिअल इस्टेट आणि आरोग्य उद्योगाशी संबंधित हिंदुजा कुटुंबाची संपत्ती 1.67 लाख कोटी रुपये आहे.

नोकरांकडून करून घ्यायचे 18 तास काम

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, हिंदुजा कुटुंबाविरुद्ध मानवी तस्करी प्रकरणी सोमवारपासून स्वित्झर्लंडमध्ये खटला सुरू झाला. पीडितांसाठी हजर झालेल्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, काही वेळा स्वयंपाकी किंवा घरगुती मदतनीस यांना 15 ते 18 तास कमी किंवा कोणतीही रजा न देता काम करण्यास भाग पाडले जायचे.

त्यांचा पगार स्विस कायद्यानुसार ठरविलेल्या रकमेच्या दहाव्या भागापेक्षा कमी होता. कर्मचारी रिसेप्शनवर उशिरापर्यंत काम करायचे आणि कधी कधी व्हिलाच्या तळघरात जमिनीवर ठेवलेल्या गाद्यांवर झोपायचे. हिंदुजा कुटुंबीयांच्या गरजेनुसार त्यांना सर्व वेळ हजर राहणे आवश्यक होते. वकिलाने कमल हिंदुजा यांनी निर्माण केलेल्या भीतीच्या वातावरणाचाही उल्लेख केला.

कुत्र्यांवर खर्च करायचे कर्मचाऱ्यांपेक्षा चौपट पैसे

सरकारी वकील यवेस बर्टोसा यांनी न्यायालयाला सांगितले होते की, हिंदुजा कुटुंबाने नोकरापेक्षा त्यांच्या कुत्र्यांवर जास्त खर्च केला. कर्मचाऱ्यांना प्रतिदिन 654 रुपये म्हणजे वर्षाला सुमारे 2.38 लाख रुपये मानधन दिले जात होते, तर कागदपत्रांवरून असे दिसून येते की कुत्र्याच्या देखभाल आणि आहारावर वर्षाला सुमारे 8 लाख रुपये खर्च केले जात होते.

या सर्व सहाय्यकांचे पासपोर्ट जप्त करण्यात आल्याचे वकिलाने सांगितले होते. अनेक कर्मचाऱ्यांना फक्त हिंदी बोलता येत असल्याने त्यांना कुठेही जाता येत नव्हते. त्यांना स्विस फ्रँक्स ऐवजी भारतीय रुपयात पैसे दिले गेले, जेणेकरून ते बाहेर जाऊन कोणतीही खरेदी करू शकणार नाहीत. त्यांना नोकरी सोडण्याची परवानगी नव्हती किंवा घराबाहेर पडण्याचीही परवानगी नव्हती.

हिंदुजा कुटुंबीयांनी फेटाळून लावले आरोप

मात्र, हिंदुजा कुटुंबाने त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी स्वत: कर्मचारी घेतले नसल्याचे सांगितले. एक भारतीय कंपनी त्यांना कामावर ठेवते. त्यामुळे त्यांच्यावरील मानवी तस्करी आणि शोषणाचे आरोप चुकीचे आहेत असे ते म्हणाले.

यासोबतच सरकारी वकिलांनी या खटल्याचे संपूर्ण सत्य सांगितले नसल्याचा दावा हिंदुजा कुटुंबीयांनी केला होता. त्यांच्या व्हिलामध्ये कर्मचाऱ्यांसाठी भोजनाची पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यांना राहण्यासाठी घरही दिले होते.

हिंदुजा कुटुंबीयांच्या वकिलाने न्यायालयात दावा केला की, त्यांचे अनेक कर्मचारी भारतात गेल्यानंतर स्वित्झर्लंडमध्ये कामावर परतले आहेत. त्यांना इथे अडचणी आल्या असत्या तर ते पुन्हा इथे कामावर परतले नसते असा युक्तीवाद त्यांनी केला.

ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटूंब आहे हिंदुजा

हिंदुजा कुटुंब आपला व्यवसाय ब्रिटनमधून चालवते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत या कुटुंबाचा समावेश आहे. फोर्ब्सच्या मते, 2023 मध्ये हिंदुजा कुटुंबाची एकूण संपत्ती 20 अब्ज डॉलर होती. हिंदुजा हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे.

हिंदुजा कुटुंबातील गोपी हिंदुजा ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. जगातील टॉप 200 श्रीमंतांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. हिंदुजा समूहाचा व्यवसाय दूरसंचार, तेल आणि वायू, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा, बांधकाम, ऑटो, हेल्थकेअर इत्यादी क्षेत्रांमध्ये आहे.

2008 पासून प्रकाश हिंदुजा मोनॅकोमध्ये राहत आहेत

प्रकाश हिंदुजा हे युरोपमधील हिंदुजा समूहाचे अध्यक्ष आहेत. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ते 2008 पासून मोनॅकोमध्ये राहत होते. विद्यापीठाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रकाश हिंदुजा इराणमधील तेहरान येथे कौटुंबिक व्यवसायात सामील झाले. नंतर ते जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे गेले आणि त्यांनी समूहाच्या युरोपियन कामकाजाची जबाबदारी घेतली.

प्रकाश हिंदुजा यांचे कमलसोबत लग्न झाले असून त्यांना अजय, रामकृष्ण आणि एक मुलगी रेणुका ही दोन मुले आहेत. फोर्ब्सच्या मते, ऑक्टोबरपर्यंत हिंदुजा कुटुंबाची एकूण संपत्ती $20 अब्ज (आता सुमारे 1.6 लाख कोटी रुपये) होती. गेल्या वर्षी फोर्ब्सच्या भारतातील श्रीमंतांच्या यादीत हिंदुजा कुटुंब सातव्या क्रमांकावर होते.

110 वर्षांपूर्वी रोवला गेला हिंदुजा ग्रुपचा पाया

हिंदुजा ग्रुपचा पाया परमानंद दीपचंद हिंदुजा यांनी 1914 मध्ये मुंबईत रोवला. त्यांना चार मुलं होती. या चार मुलांचे कुटुंब हिंदुजा ग्रुप सांभाळते. कौटुंबिक व्यवसाय सध्या चार हिंदुजा बंधू – श्रीचंद, गोपीचंद, प्रकाश आणि अशोक सांभाळत आहेत. गेल्या वर्षी 17 मे रोजी श्रीचंद हिंदुजा यांचे निधन झाले.

हिंदुजा समूहाचे कार्यालय 1919 मध्ये इराणमध्ये हलवण्यात आले. यानंतर हिंदुजा ग्रुपचा व्यवसाय तेथून 1995 पर्यंत चालू राहिला. 1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाल्यानंतर तेथील परिस्थिती बदलली, त्यानंतर हिंदुजा ग्रुपला लंडनला जावे लागले. हिंदुजा समूहाचा व्यवसाय सुमारे 50 देशांमध्ये पसरलेला असून त्यात दीड लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. या समूहात भारतातील सहा सूचीबद्ध कंपन्या आहेत.

बोफोर्स घोटाळ्यातही जोडले गेले होते नाव

बोफोर्स घोटाळ्यात श्रीचंद, गोपीचंद आणि प्रकाश हिंदुजा यांचीही नावे पुढे आली होती. या घोटाळ्यात स्वीडिश कंपनी बोफोर्सवर 1986 मध्ये भारत सरकारला 1.3 अब्ज डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप आहे. यात तिन्ही भावांनी मदत केली. सीबीआयने ऑक्टोबर 2000 मध्ये तिन्ही भावांवर हे आरोप लावले होते, परंतु 2005 मध्ये दिल्ली न्यायालयाने पुराव्याअभावी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.

हिंदुजा घराण्याचा अनोखा नियम

चार वर्षांपूर्वी हिंदुजा कुटुंबात फूट पडल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. वास्तविक, याचे कारण 2014 मध्ये या कुटुंबात झालेला करार होता. या करारानुसार, ‘हिंदुजा समूहाच्या मालमत्तेवर प्रत्येकाचा हक्क असून काहीही कोणाचे नाही.’

म्हणजे हिंदुजा कुटुंबातील एका भावाच्या मालकीची संपत्ती इतर भावांच्याही मालकीची असेल. प्रत्येक व्यक्ती इतरांना त्याचे कार्यवाहक म्हणून नियुक्त करेल. या करारावर चारही भावांनी सह्या केल्या होत्या. पुढे हिंदुजा कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य श्रीचंद हिंदुजा यांच्या मुलींना या करारातून बाहेर पडायचे होते. त्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्जही दाखल केला होता.

श्रीचंद हिंदुजा यांच्या मुलींनी आरोप केला होता की त्यांच्या काकांनी त्यांना कुटुंबापासून वेगळे केले आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत केले आहे. त्याचवेळी श्रीचंद हिंदुजा यांच्या इतर भावांनी या दोन बहिणींवर सर्व मालमत्ता हडप केल्याचा आरोप केला होता.

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply