नागपूर : (Vidarbha Konkan Gramin Bank’s retired employee’s protest) विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी आज दिनदयाल नगर येथील मुख्य शाखेसमोर धरणा आंदोलन केले. बँक व्यवस्थापनाने तत्कालीन वैनगंगा क्षेत्रीय ग्रामीण बँकेतल्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवरचे सन 2011-12 या आर्थिक वर्षाचे व्याज दिले नाही. त्यामुळे सध्यस्थितीत प्रत्त्येक कर्मचाऱ्याचे जवळपास साठ हजार रूपये आणि बँकेचे जवळपास दिड कोटी कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. व्याजाची थकबाकी असलेली रक्कम भविष्य निधी कार्यालयाला मागावी आणि कर्मचाऱ्यां व बँकेचे नुकसान टाळावे यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी आणि मृत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांनी मुख्य शाखेसमोर धरणा आंदोलन केले.
सेवानिवृत्तीला दोन वर्ष उलटूनही कर्मचाऱ्यांना पी.एफचे पैसे मिळाले नाही
भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा हक्काचा पैसा असतो. सेवा निवृत्तीनंतर महिन्याभरात ही रक्कम मिळणे अपेक्षीत असते मात्र सेवा निवृत्तीला दिड ते दोन वर्ष उलटूनही काही कर्मचाऱ्यांना तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना पी.एफचे पैसे मिळाले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच बँकेचे कर्मचारी राजू देवराव राऊत यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. बँकेत अनुकंपा तत्वावर सामावून घेण्याचे प्रावधान असूनही अद्याप त्यांच्या वारसदाराला नोकरीत सामावून घेतले नाही. त्यांच्या वारसदाराला नोकरीत सामावून घेण्यात यावे अशी मागणीही यावेळी निवृत्त कर्मचाऱ्यांनी केली.
निवेदन न देताच आंदोलक परतले
धरणा आंदोलनानंतर बँकेचे चेअरमन बिजोय कुमार वर्मा यांना निवेदन देण्यासाठी निवृत्त कर्मचारी गेले, मात्र आंदोलकांपैकी फक्त दोघांना आत येण्याची परवाणगी देण्यात आली. किमान पाच जणांना निवेदन देण्याची मागणी आंदोकांनी केली, मात्र त्यांची मागणी फेटाळून लावण्यात आली. नाराज आंदोलकांनी चेअरमन मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या. विलास हेडाऊ, निलकंठ मेश्राम, राजेश राणे, वसंत खोलगडे, विनायक जोशी, मुकेश अवताडे, वैद्य यांच्यासह अनेक निवृत्त कर्मचारी तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांचा समावेश होता.