मुंबई : (Tirupati Laddu Controversy) आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिराच्या प्रसादात प्राण्यांच्या चरबीच्या कथित वापरावरून देशभरात मोठा वाद सुरू आहे. तिरुपतीच्या मंदिरात सापडलेल्या लाडूंमध्ये ‘बीफ टॅलो’ म्हणजेच प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल असल्याची पुष्टी झाली आहे. तसा अहवालही देण्यात आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आरोप केला होता की, वायएसआर काँग्रेस पक्षाच्या मागील सरकारच्या काळात तिरुपती मंदिरात भाविकांना दिले जाणारे प्रसाद लाडू हे प्राणी आणि माशांच्या तेलाने बनवले जात होते.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले होते की, लाडू बनवण्यासाठी तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जाते. या सामुग्रीच्या वापरामुळे मंदिराच्या पावित्र्याशी तडजोड तर झालीच पण श्रद्धेवरही परिणाम झाल्याचे ते म्हणाले. सत्ताधारी तेलुगु देसम पक्षाने (टीडीपी) गुरुवारी दावा केला की भेसळीची गुजरातस्थित पशुधन प्रयोगशाळेने पुष्टी केली आहे.
टीडीपीचे प्रवक्ते अनम वेंकट रमण रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत कथित प्रयोगशाळेचा अहवाल दाखवला, ज्याने प्रदान केलेल्या तुपाच्या नमुन्यात ‘बीफ टैलो’ म्हणजेच प्राण्यांची चरबी असल्याची पुष्टी केली आहे. अशा स्थितीत प्रसाद बनवण्यासाठी वापरण्यात येणारा हा बीफ टॉलो म्हणजे नेमके काय याबद्दल आपण जाणून घेऊया.
बीफ टैलो म्हणजे काय? (What is beef tallow)
तिरूपती मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूचा मुख्य वाद बीफ टॅलोच्या कथित वापराशी संबंधित आहे. बीफ टॅलो हे रंप रोस्ट, रिब्स आणि स्टीक्स सारख्या गोमांसच्या कापांपासूनची चरबी असते. हे मांसापासून काढलेली शुद्ध चरबी वितळवून देखील बनवता येते, जे थंड झाल्यावर लवचिक पदार्थात बदलते.
बीफ टेलो, सामान्यतः गायीची चरबी म्हणून ओळखली जाते. ज्याचा वापर अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो. बीफ टॅलोमध्ये जास्त प्रमाणात चरबी असते, जी ऊर्जेचा चांगला स्रोत आहे. त्यात शरीरासाठी आवश्यक असलेली जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि के देखील असतात. संतुलित प्रमाणात खाल्ले तर ते निरोगी आहाराचा भाग होऊ शकतो. शाकाहार आणि मांसाहार या वादाच्या पलिकडचा हा मुद्दा आहे.
बीफ टॅलोचा वापर रोस्ट, बेक आणि इतर पदार्थांमध्ये चव जोडण्यासाठी केला जातो. बीफ टॅलो बेकिंगमध्ये देखील वापरला जातो, विशेषत: काही प्रकारच्या पेस्ट्री आणि पाईमध्ये. इतकेच नाही तर फास्ट फूड उद्योगात बीफ टॅलो तळण्यासाठी वापरला जातो.
गोमांस टॅलो वापरण्याबद्दलचा वाद काय आहे? (Beef Tallow in Tirupati laddu)
गोमांस टॅलो वापराशी संबंधित काही विवाद आहे. अनेक आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सॅच्युरेटेड फॅटचे जास्त सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धेनुसार, काही समुदायांमध्ये गोमांस खाण्यास मनाई आहे, ज्यामुळे बीफ टॉलोच्या वापराबाबत सामाजिक आणि धार्मिक वाद निर्माण होतात.
तिरुपती लाडू संबंधीत लॅब रिपोर्ट नेमका काय आहे? (Tirupati Laddu Report)
प्रयोगशाळेच्या कथित अहवालात नमुन्यांमध्ये “लार्ड” (डुकराच्या चरबीशी संबंधित) आणि फिश ऑइलचाही दावा करण्यात आला आहे. यासाठी नमुना 9 जुलै 2024 रोजी घेण्यात आला आणि प्रयोगशाळेचा अहवाल 16 जुलै रोजी आला.
TTD ने आता प्रसादाची गुणवत्ता तपासण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन केली आहे. या चौकशी समितीचे सदस्य विजयवाडाचे माजी प्राचार्य शास्त्रज्ञ डॉ बी सुरेंद्रनाथ, प्रोफेसर बी महादेवन (आयआयएम-बंगलोर), तेलंगणा पशुवैद्यकीय विद्यापीठाचे डॉ जी स्वर्णलथा असतील.
तिरूपतीमध्ये दररोज बनविले जातात 3.50 लाख लाडू
आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिर हे जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत धार्मिक स्थळांपैकी एक मानले जाते. येथे दररोज 70 हजारांहून अधिक भाविक देशाच्या कान्या-कोपऱ्यातून भगवान व्यंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेण्यासाठी येतात. तिरुपती मंदिराची प्रशासकीय व्यवस्था तिरुपती तिरुमला देवस्थानम्स (TTD) द्वारे हाताळली जाते.
मंदिर परिसरात 300 वर्ष जुने किचन पोट्टू आहे, ज्यामध्ये दररोज तुपाचे 3.50 लाख लाडू बनवले जातात. शुद्ध बेसन, बुंदी, साखर, काजू आणि शुद्ध तुपापासून बनवलेला हा लाडू तिरुपती मंदिराचा मुख्य प्रसाद आहे.
200 ब्राह्मण हा प्रसाद बनवतात. प्रसाद बनवण्यासाठी मंदिर दरवर्षी सुमारे 5 लाख किलो तूप आणि दर महिन्याला 42000 किलो तूप खरेदी करते. हे तूप दर महिन्याला ई-निविदेद्वारे खरेदी केले जाते.
प्रसादाच्या लाडूसाठी तुपाचा पुरवठा कोण करतं?
YSRCP आणि TDP सरकारचे वेगवेगळे पुरवठादार आहेत. कर्नाटक मिल्क फेडरेशन (KMF) गेल्या 50 वर्षांपासून ट्रस्टला तूप पुरवठा करत आहे. जुलै 2023 मध्ये, KMF ने कमी दरात तूप पुरवठा करण्यास नकार दिला, त्यानंतर जगन सरकारने (YSRCP) 5 कंपन्यांना पुरवठ्याचे काम दिले. यापैकी एक तामिळनाडूच्या दिंडीगुल येथील एआर डेअरी फूड्स आहे, ज्याचे उत्पादन सदोष असल्याचे आढळले.
नायडू सरकारने तूप विक्रेत्यांना केले ‘ब्लॅक लिस्ट’
नायडू सरकारने जून 2024 मध्ये वरिष्ठ IAS अधिकारी जे श्यामला राव यांची तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) चे नवीन कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. प्रसादाचा (लाडू) दर्जा तपासण्याचे आदेश दिले. त्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली होती.
समितीने प्रसादाची चव आणि दर्जा सुधारण्यासाठी अनेक सूचना केल्या. तसेच, लाडूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या चाचणीसाठी गुजरातस्थित नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे (NDDB) नमुने पाठवण्यात आले होते. जुलैमधील अहवालात प्राण्यांच्या चरबीचा उल्लेख करण्यात आला होता.
यानंतर, टीटीडीने एआर डेअरी फूड्सकडून आलेला तुपाचा साठा परत केला. तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले. यानंतर टीटीडीने पुन्हा केएमएफकडून तूप खरेदी करण्यास सुरुवात केली. एआर डेअरी फूड्सकडून 320 रुपये प्रति किलो दराने तूप उपलब्ध होते, तर तिरुपती ट्रस्ट आता कर्नाटक को-ऑपरेटिव्ह मिल्क फेडरेशन (KMF) कडून 475 रुपये प्रति किलो दराने तूप खरेदी करत आहे.