मुंबई : (Rishi panchami vrat katha Marathi) यावर्षी 8 सप्टेंबरला म्हणजेच आज ऋषीपंचमीचा सण साजरा होत आहे. आज शेगाव निवासी संत श्री गजानन महाराज यांची पुण्यतिथी देखील आहे. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:03 ते दुपारी 1:34 पर्यंत असेल. मात्र भक्त आपल्या श्रद्धेने दिवसभरात कधीही पूजा करू शकतात. या दिवशी उपवास करणाऱ्या स्त्रिया सप्त ऋषींची पूजा करतात आणि अजाणतेपणे केलेल्या पापांपासून मुक्तीसाठी प्रार्थना करतात. व्रत पाळणाऱ्या महिलांनी ऋषीपंचमीची कथा वाचणे अनिवार्य मानले जाते. ऋषी पंचमीची कथा आणि पुजेचा विधी जाणून घेऊया.
ऋषी पंचमी व्रत कथा (Rishi Panchami katha PDF)
ऋषी पंचमीच्या पौराणिक कथेनुसार, विदर्भ देशात उत्तंक नावाचा एक सद्गुणी ब्राह्मण राहत होता. ज्याची पत्नी अत्यंत देवभक्त होती, तीचे नाव सुशीला होते. त्या ब्राह्मणाला एक मुलगा आणि एक मुलगी होती. काही काळानंतर त्याने आपल्या मुलीचे लग्न केले. मात्र काही दिवसांनी मुलगी विधवा झाली. दुःखी ब्राह्मण जोडपे आपल्या मुलीसह गंगेच्या काठावर झोपडीत राहू लागले.
एके दिवशी ब्राह्मण मुलगी झोपली असताना अचानक तिच्या अंगाला किडे लागले. मुलीच्या आईला कळल्यावर तिने नवऱ्याला विचारले, माझ्या पुण्यवान मुलीची ही अवस्था होण्याचे कारण काय? त्या वेळी उत्तंकजींना समाधीद्वारे ही घटना कळली आणि त्यांनी सांगितले की ही मुलगी तिच्या पूर्वीच्या जन्मातही ब्राह्मण होती. मासीक धर्मअ सतानाही त्यांनी भांड्यांना हात लावला होता. त्या पापापासून मुक्त होण्यासाठी, तीने त्या वेळी तसेच या जन्मात कोणतेही उपाय केले नाहीत. त्यामुळे तीच्या शरीराला किडे लागले आहेत.
धर्मग्रंथानुसार मासिक पाळी येणारी स्त्री पहिल्या दिवशी चांडालिनी, दुस-या दिवशी ब्रह्मघटिनी आणि तिसऱ्या दिवशी धोबीनीसारखी अपवित्र असते. चौथ्या दिवशी स्नान केल्यावरच ती शुद्ध होते. पण तरीही मुलीने ऋषीपंचमीचे व्रत शुद्ध मनाने पाळले तर तिचे सर्व दु:ख दूर होतील. वडिलांच्या परवानगीने मुलीने ऋषीपंचमीचे व्रत केले. व्रताच्या प्रभावामुळे तीच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊन तीला पुढील जन्मात शाश्वत सौभाग्य प्राप्त झाले.
दुसरी कथा
ऋषी पंचमीच्या कथेनुसार, एका शहरात एक शेतकरी आणि त्याची पत्नी राहत होते. एकदा त्याच्या पत्नीला मासिक पाळी आली, पण हे माहीत असूनही तिने आपले काम चालू ठेवले. त्यामुळे त्याचा तीला दोष लागला, या दरम्यान तीचा नवराही तीच्या संपर्कात आल्याने तोही या दोषाचा बळी ठरला, त्यामुळे दोघेही पुढच्या जन्मात पशू बनले. बायको कुत्री जन्मली, तर नवरा बैल झाला.
याशिवाय या दोघांमध्ये इतर कोणतेही दोष नव्हते, त्यामुळे त्यांना त्यांच्या मागील जन्माच्या सर्व गोष्टी आठवल्या. या रुपात दोघेही आपल्या मुलाच्या घरी राहू लागले. एके दिवशी ब्राह्मण मुलाच्या घरी आले आणि त्यांच्या पत्नीने ब्राह्मणांसाठी अन्न शिजवले. मात्र यादरम्यान एक पाल खीरमध्ये पडली, जी त्याच्या आईने पाहिली.
आपल्या मुलाला ब्राह्मण हत्येपासून वाचवण्यासाठी तिने त्या खीरीला तोंड लावले, पण कुत्र्याची ही कृती पाहून सुनेला खूप राग आला आणि तिने तिला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. रात्री बैलाच्या रूपात ती आपल्या पतीला हे सर्व सांगत होती तेव्हा तिच्या मुलाने तिचे सर्व बोलणे ऐकले. मग तो एका ऋषीकडे गेला आणि त्याचा उपाय विचारला.
ऋषींनी मुलाला सांगितले की आपल्या आई-वडिलांना या दोषापासून मुक्त करण्यासाठी तुला आणि तुझ्या पत्नीला ऋषीपंचमीचे व्रत करावे लागेल. ऋषींच्या सल्ल्यानुसार पुत्रानेही तेच केले, त्यामुळे दोघेही प्राणीरूपातून मुक्त झाले. त्यामुळे ऋषीपंचमीचे व्रत महिलांसाठी अतिशय शुभ मानले जाते.
ऋषी पंचमीची पूजा विधी (Rishi Panchami Puja Vidhi)
- ऋषीपंचमीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करावे.
- पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.
- चौरंगावर तांदूळ आणि सात सुपाऱ्या मांडाव्या.
- हात जोडून सप्त ऋषींना आवाहन करावे.
- दुर्वांनी पाणी शिंपडावे.
- त्यानंतर पंचामृत शिंपडावे.
- परत पाणी शिंपडून शुद्धोदक स्नानमः समरपयामी म्हणावे.
- प्रत्त्येक सुपारीला गंध फुलं अक्षता वाहाव्या.
- तीन वेळा पाणी ताम्हणात सोडून व्रताचा संकल्प घ्या.
- आता सप्त ऋषींचे स्मरण करावे.
- जाणते अजाणतेपणे झालेल्या चुकांची क्षमा मागावी.
- ऋषी पंचमीची कथा वाचावी.
- ऋषीची आरती म्हणावी.
- नैवेद्य दाखवावा आणि त्याचा घरच्यांना प्रसाद द्यावा.
- ब्राम्हणाला यथाशक्ती दान करावे.
- या दिवशी बैलाने नांगरलेल्या भाज्या वापरत नाही. त्यामुळे घरी लागवड केलेल्या भाज्यांचे अन्न बनवले जाते. देवभाताच्या तांदूळाचा भात केला जातो. ज्याला ऋषी पंचमीचे तांदूळ देखील म्हणतात.
(अस्विकरण- वरिल माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कोणाताही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)