You are currently viewing Mumbai Ghatkopar hoarding collapse : मुंबई होर्डिंग दुर्घटनेचे नेमके कारण आले समोर!
Mumbai Hoarding collapse Reason

Mumbai Ghatkopar hoarding collapse : मुंबई होर्डिंग दुर्घटनेचे नेमके कारण आले समोर!

मुंबई : (Mumbai Ghatkopar hoarding collapse) मुंबईच्या घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी 13 मेच्या संध्याकाळी घडली. मुंबईसह परिसरात चक्रीवादळ आले यामुळे हे होर्डिंग पडले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी, या दुर्घटनेसाठी फक्त चक्रीवादळच जबाबदार आहे का? हा प्रश्न सामान्य नागरीक म्हणून आपल्याला अवश्य पडायला हवा. 14 निष्पाप लोकांचा जीव ज्या होर्डिंगखाली दबून झाला, ते होर्डिग पडण्यामागे फक्त चक्रीवादळच नाही तर, भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाचाही तितकाच हातभार आहे.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

सोमवारी मुंबईत दुपारनंतर अचानक अंधारून आले. वातावरणात गारवा आला आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला. धुळीचं मोठ वादळ मुंबईत थैमान घालत होतं. या वादळामुळे वाहतूक विस्कळीत झाली. पावसाचा जोर वाढला. लोकांमध्ये भीतीचं वातारण होतं. अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला. इतक्यातचं एक बातमी सोशल मिडीयावर आणि  चॅनलवर वाऱ्याच्या वेगाने पसरली, घाटकोपरच्या पेट्रेलपंप जवळचे होर्डिंग कोसळले.

या होर्डिंगखाली दबून 14 जणांचा मृत्यू झाला तर, 74 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. याशीवाय वडाळामध्ये लोखंडी पूल कोसळून आठ जण जखमी झाले. मात्र सगळीकडे चर्चा होती ती होर्डींग कोसळल्याच्या दुर्घटनेचीचं!

घाटकोपरच्या छेडा नगरमध्ये वेस्टन एक्सप्रेस हायवेजवळ एक पेट्रोलपंप आहे. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास या पेट्रोल पंपवर जवळपास शंभर जण होती. काही जण पावसापासून बचाव करण्यासाठी पेट्रोल पंपच्या आडोशाला उभी होती. वाऱ्याचा वेग वाढला आणि पेट्रोल पंपावरचे होर्डिंग अचानक कोसळले. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ केली. होर्डिंगखाली दबलेल्यांनी मदतीसाठी टाहो फोटला, पण होर्डिंगचा भार इतका जास्त होता की त्यातून सहजासहजी बाहेर पडणे शक्य नव्हते.

घटनेचा माहिती मिळताच अग्नीशमन दल, पोलीस, एनडीआरएफची टीम आणि रूग्णवाहिका थोड्याच वेळात परिसरात दाखल झाल्या. होर्डिंग हटवण्यासाठी क्रेन देखील बोलावण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटूंबीयांना पाच लाख रूपये देण्याचे आश्वासन दिले. तसेच जखमींवर सरकारी रूग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे जाहिर केले.

मुंबईतलं सगळ्यात मोठ होर्डिंग

सोमवारी जे होर्डिंग पडलं ते मुंबईतील सगळ्यात मोठं होर्डिंग होतं. या होर्डिंगची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे.  होर्डिंग 1740 चौरस फुट इतकं मोठं होतं अशी माहिती मिळतेयं.  होर्डिंग लोखंडाचा वापर करून बनवलं होतं याचं वजन जवळपास 250 टन असल्याचं सांगितल्या जातंय.  बील बोर्ड बांधणाऱ्या इगो मिडीया कंपनीकडून होर्डिंग उभारलं होतं.

या कंपनी विरोधात पंतनगर पोलिस ठाण्यात कलम 304, 338, 337, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या एजन्सीचे मालक भावेश भिंडे दुर्घटनेनंतर आपल्या परिवारासोत फरार आहेत.  होर्डिंग ज्या ठिकाणी उभारण्यात आलं होतं ती जागा नेमकी कोणाच्या मालकीची होती?  होर्डिंग उभारण्यासाठी परवाणगी कोणी दिली? अशा काही मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे.

मुंबई महानगरपालिकेनं या दुर्घटनेसाठी लोहमार्ग पोलिसांना जबाबदार धरले आहे. मुंबई महानगरपालिकंनं काढलेल्या एका पत्रात असं नमुद करण्यात आलं आहे की, ज्या जागेवर हे होर्डिंग उभारण्यात आलं आहे ती जागा लोहमार्ग पोलिस वेलफेअरची आहे. संबंधीत लोहमार्ग पोलिसांनीच  होर्डिंग लावण्यासाठी इगो मिडीया कंपनीला परवाणगी दिली होती.

होर्डिंग लावण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी तसेच इगो मिडीया कंपनीने महानगरपालिकेची कोणतीही परवाणगी तसेच एनओसी घेतली नव्हती असंही पत्रात नमुद करण्यात आलं आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून जाहिरात होर्डिंगसाठी जास्तीतजास्त 40 बाय 40 फुटांची परवाणगी दिली जाते. मात्र जे होर्डिंग कोसळलं आहे त्याचा आकार 120 बाय 120 फुट इतका असून हे बेकायदेशीर असल्याचं महानगरपालिकेनं म्हंटलं आहे.

या दुर्घटनाग्रस्त होर्डिंगला 2021 मध्ये परवाणगी देण्यात आली होती. मग मागच्या दोन वर्षात महानगरपालिकेला बेकायदेशीर होर्डिंग का दिसलं नाही? लोहमार्ग पोलिसांसोबत याबाबतीत कोणताही पत्रव्यवहार का केला नाही असा प्रश्न आता लोहमार्ग पोलिसंच महानगरपालिकेला विचारतंय.

अशा प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी व्हाट्स अप चॅनलला जॉइन करा- https://whatsapp.com/channel/0029VadLYkIE50Uaa2sD712s

नेमकी चुक कोणाची?

मुंबई लोहमार्ग पोलिस दलाचे आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, होर्डिंगची जागा ही लोहमार्ग पोलिसांच्या मालकीची आहे. मी पदभार स्विकारण्याआधी  होर्डिंग उभारण्यासाठी परवाणगी दिली होती. ही परवाणगी कोणाच्या अखत्यारित देण्यात आली होती याची गांभिर्याने दखल घेण्यात येईल असे शिसवे म्हणाले. दुसरीकडे पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी संबंधीत कंपनीचे सर्व होर्डिंग काढण्याचे आदेश दिले आहे.

दुर्घटना झाल्यानंतर प्रत्त्येक जण आता आपआपली बाजू सावरण्याचा आणि एक मेकांकडे बोट दाखवण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत आहे. हे होर्डिंग अनाधीकृत होतं, नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आलेल्या या होर्डिंगमधून महिन्याला लाखो रूपयांचा नफा कमाविला जात होता. या नफ्यात किती वाटेकरी होते? खुद्द पोलिसंच या प्रकरणात झाकपाक करत असताना याचा नेमका तपास कोण आणि कसा करणार? असे किती होर्डिंग बेकायदेशीर आहेत? हे प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहेत.

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply