You are currently viewing वाल्याचा वाल्मिकी कसा झाला? तुम्हाला माहिती आहे का ही गोष्ट? : Maharshi Valmiki Jayanti 2024
वाल्मिकी जयंती

वाल्याचा वाल्मिकी कसा झाला? तुम्हाला माहिती आहे का ही गोष्ट? : Maharshi Valmiki Jayanti 2024

मुंबई : (Maharshi Valmiki Jayanti 2024) रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांना त्यांच्या विद्वत्ता आणि तपश्चर्येमुळे महर्षी ही पदवी मिळाली. महर्षी वाल्मिकी यांचा जन्मदिवस वाल्मिकी जयंती म्हणून साजरा केला जातो. यंदा वाल्मिकी जयंती 17 ऑक्टोबर, गुरुवारी आहे. महर्षि वाल्मिकी यांचे नाव केवळ एका समाजापुरते मर्यादित नाही तर त्यांचे ज्ञान आणि मार्गदर्शन आजही कोट्यावधी लोकांसाठी प्रेरणास्थान आहे. वाल्मिकी ऋषी कोण होते? आणि इतिहासात त्यांच्या भूमीकेला अनन्यसाधारण महत्त्व का आहे ते जाणून घेऊया.

या दिवशी साजरी होणार वाल्मिकी जयंती

महर्षी वाल्मिकी यांचा जन्म अश्विन महिन्यातील शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला. यावर्षी आश्विन महिन्याची पौर्णिमा 16 ऑक्टोबर रोजी रात्री 08:40 वाजता सुरू होत आहे. ही तारीख 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 04:55 वाजता संपेल. अशा स्थितीत गुरुवार, 17 ऑक्टोबर रोजी वाल्मिकी जयंती साजरी होणार आहे.

वाल्मिकी जयंतीचे महत्त्व

वाल्मिकी जयंती दरवर्षी महर्षी वाल्मिकी यांच्या जन्मदिनी साजरी केली जाते. वाल्मिकी ऋषी हे रामाचे महान भक्त मानले जातात. महर्षी वाल्मिकींनी रामायण रचले होते. वाल्मिकी जयंती तर सर्वजण साजरी करतात, मात्र वाल्मिकी समाजातील लोकांसाठी वाल्मिकी जयंती विशेष मानली जाते. वाल्मिकी समाजातील लोक वाल्मिकी ऋषींना देवाचे रूप मानून त्यांची पूजा करतात. या दिवशी त्यांची मंदिरे आणि ठिकाणे फुलांनी सजविली जातात आणि रामायणाचे पद गायल्या जातात.

महर्षि वाल्मिकी कोण होते (Valmiki Vrushi story)

महान ऋषी होण्यापूर्वी महर्षि वाल्मिकी हे रत्नाकर नावाचे डाकू होते. रत्नाकर नावाचा हा डाकू आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जंगलात आलेल्या लोकांना लुटायचा. पण एके दिवशी नारद मुनींच्या भेटीने त्यांचे आयुष्यच बदलले. नारद मुनींनी रत्नाकरला विचारले, “तू लोकांना लुटायचं काम का करतो? त्यावर डाकू म्हणाला, मी माझ्या कुटूंबाचं पालन पोशन करण्यासाठी हे काम करतो. यावरचं माझ घर चालतं.

त्यावर नारद मुनींनी त्याला विचारले की, तुझ्या कुटूंबासाठी मुला बाळांसाठी हे पापकृत्य करतोय त्या पापात ते भागिदार बनतील का? तू त्यांना कधी हे विचारले का? असा प्रश्न करताच रत्नाकर डाकू चिंतेत पडला. त्याने घरी जात आपल्या कुटूंबातील लोकांना विचारले की, मी जे तुमच्यासाठी लोकांना लुटायचं पाप कर्म करतोय त्या पापात तुम्ही माझे भागिदार व्हाल काय? त्यावर कुटूंबातील लोकं म्हणाली आमच पोट कसं भरायचं ते तुम्ही ठरवा मात्र तुमच्या पापात आम्ही भागिदार होणार नाही.

घरच्यांचे उत्तर एकून डाकू अवाक् झाला. त्याला त्याच्या कामाचा पश्चाताप झाला आणि तो क्षमा मागण्यासाठी तपश्चर्येत गढून गेला. त्यांची तपश्चर्या इतकी खोल होती की मुंग्यांनी त्यांच्या सभोवताली घर केले आणि ते ‘वाल्मिकी’ (मुंगीच्या घरातून) म्हणून ओळखले जाऊ लागले. महर्षी वाल्मिकींची कथा सांगते की खऱ्या पश्चात्तापाने आणि तपश्चर्येने माणूस कितीही मोठा पापी असला तरी त्याला मोक्ष मिळू शकतो.

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply