मुंबई : (Guru Purnima 2024) हिंदू धर्मात गुरू परंपरेला विशेष महत्त्व आहे. याच कारणामुळे गुरूपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जातो. गुरू आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्याचे गुरूपौर्णिमा हा सण प्रतिक आहे. गुरूपौर्णिमेला वेद पौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. यादिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने विशेष पुण्य फल प्राप्ती होते. गुरू हे त्याच्या शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन याण्याचे कार्य करतात, त्यामुळे या दिवशी शिष्य त्यांच्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. उद्या 21 जुलैला गुरूपौर्णिमा साजरी होणार आहे. यानिमित्त्याने जाणून घेऊया गुरूपौर्णिमेचे महत्त्व, पुजा विधी आणि इतर माहिती.
गुरू पौर्णिमा तारिख आणि मुहूर्त
वैदिक दिनदर्शिकेनुसार आषाढ महिन्याची पौर्णिमा 20 जुलैला संध्याकाळी 5.59 वाजता सुरू होणार आहे, जी 21 जुलै रोजी दुपारी 3.46 वाजता संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार 21 जुलै 2024 ला गुरूपौर्णिमा साजरी केली जाईल. 21 तारखेला गुरू पौर्णिमा झाल्यानंतरही तूम्ही पुढचे 15 दिवस गुरूपूजन करू शकता.
गुरू पौर्णिमा 2024 पूजा मुहूर्त
गुरू पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या गुरूची पूजा करायची असल्यास पहाटे 5.46 ते दुपारी 3.46 या शुभ काळात करावी. ही वेळ अत्यंत शुभ आहे. गुरू दिक्षा घ्यायची असल्यास ती देखील याच काळात घ्यावी. यामुळे गुरूची विशेष कृपा लाभेल.
गुरूपौर्णिमा 2024 शुभ योग
यंदाची गुरू पौर्णिमा दरवर्षीपेक्षा विशेष असणार आहे, कारण या शुभ दिनी काही विशेष योग तयार होत आहेत. उत्तराषाद नक्षत्रासह विश्वकुंभ, प्रीति योगासह सर्वार्थसिद्धी योग तयार होत आहे. विशेष म्हणजे पहाटे 5.57 पासून सर्वार्थसिद्धी योग दिवसभर चालणार आहे.
गुरू पौर्णिमा पूजाविधी
- गुरू पौर्णिमेच्या दिवशी ब्रम्हमुहूर्तावर उठावे. सर्व प्रातविधी उरकून स्नान करावे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या दिवशी पवित्र नदित स्नान करणे अधिक फलदायी ठरते. मात्र नदीत स्नान करणे शक्य नसल्यास आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकून आंघोळ केल्यासदेखील पुण्यफल प्राप्ती होते.
- स्नान केल्यानंतर स्वत्छ वस्त्र परिधान करून तांब्याच्या भांड्यात पाणी, शेंदूर आणि लाल फुले टाकून सूर्याला अर्पण करावे. यानंतर घरच्या देवांची विधीवत पूजा करावी.
- तुम्ही ज्यांना गुरू मानता त्यांना पिवळ्या फुलांचा हार घालावा व पिवळ्या मिठाईंचा नैवेद्य दाखवावा. याशिवाय पिवळे वस्त्र भेट म्हणून द्यावे. यथाशक्ती गुरूदक्षिणा द्यावी.
- गुरू या जगात नसतील तर त्यांच्या चरण पादुकांचे पुजन करावे. गुरू ही एखादी व्यक्तीच असणे आवश्यक नाही तुम्ही एखाद्या देवालाही तुमचे गुरू मानू शकता. त्या देवतेची या दिवशी गुरू स्वरूपात पूजा करावी.
गुरू पौर्णिमा कथा
गुरुपौर्णिमा हा सण साजरा करण्यामागील मुख्य कारण म्हणजे महर्षी वेदव्यास यांचा जन्म. महर्षी वेदव्यास भगवान विष्णूचे अंश म्हणून पृथ्वीवर आले. त्यांच्या वडिलांचे नाव ऋषी पराशर आणि आईचे नाव सत्यवती होते. त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या आई-वडिलांकडे देवाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि जंगलात तपश्चर्या करण्यास सुरुवात केली.
मात्र त्याच्या आईने ही इच्छा नाकारली. महर्षि वेदव्यास यांनी यासाठी त्यांच्या आईकडे आग्रह धरला आणि त्यांचा मुद्दा मान्य केला. तपश्चर्येनंतर आमच्याकडे परत या असा आदेश दिला.
यानंतर वेदव्यास तपश्चर्येसाठी वनात गेले आणि तेथे त्यांनी कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्येमुळे त्यांना संस्कृत भाषेत प्राविण्य प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी चार वेदांचा विस्तार केला, महाभारत (महाभारत कथा), अठरा महापुराण आणि ब्रह्मास्त्र रचले, त्यांना चिरंजीवी वरदान मिळाले. महर्षि वेदव्यास आजही कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्यात आहेत असे म्हणतात. म्हणून हिंदू धर्मात वेद व्यासांना देव म्हणून पूजले जाते. आजही वेदांचे ज्ञान घेण्यापूर्वी महर्षी वेदव्यास यांचे नाव प्रथम घेतले जाते.