मुंबई : (Ganesh Chaturthi puja vidhi Marathi) श्रावण महिना संपायला आला की, ओढ लागते ती आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची. गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो भगवान गणेशाला समर्पित आहे. दरवर्षी गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi 2024 date) भाविक मोठ्या थाटामाटात आणि भक्तीभावाने गणेशाची पूजा करतात. भगवान गणेश ही बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याची देवता आहे. भगवान गणेशाला गजानन, धुम्रकेतू, एकदंत, वक्रतुंडा आणि सिद्धी विनायक अशा विविध नावांनी ओळखले जाते. हिंदू पंचांगानुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीपासून देशभरात गणेश चतुर्थी उत्सव सुरू होतो.
गणेश चतुर्थी हा सण प्रामुख्याने 10 दिवसांचा असतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी भक्त बाप्पाला आपल्या घरी आणतात आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देतात. आज आपण गणेश चतुर्थी 2024 ची तारीख, घटस्थापनेची शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
गणेश चतुर्थीची तारीख
हिंदू पौराणिक कथेनुसार, हिंदू कॅलेंडरमधील भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात भगवान गणेशाचा जन्म झाला. या वर्षी गणेश चतुर्थी शनिवार, 7 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे, तर गणेश विसर्जन मंगळवार, 17 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे.
गणेश चतुर्थीची स्थापना वेळ
हिंदू कॅलेंडरनुसार, विनायक चतुर्दशी तिथी शनिवार, 06 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 03:01 वाजता सुरू होईल आणि रविवार, 07 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 05:37 वाजता समाप्त होईल. याशिवाय मूर्ती स्थापनेचा मुहूर्त सकाळी 11.03 वाजता सुरू होऊन दुपारी 1.34 वाजता संपेल. म्हणजे एकूण कालावधी 2 तास 31 मिनिटे असेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, गणेश चतुर्थीच्या दिवशी 06 सप्टेंबर रोजी रात्री 09:01 ते रात्री 08:16 पर्यंत चंद्राचे दर्शन टाळण्याचा सल्ला दिला जातो.
गणपती प्रतिष्ठापना पूजेसाठी लागणारे साहित्य
- शाडू मातीची गणपती मूर्ती
- हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, अष्टगंध, अक्षता
- 10 सुपार्या, 5-5 खारीक, बदाम, हळकुंड, अक्रोड
- रेशीम कापड, कापसाची वस्त्रे, 2 जानवी जोड, 1 पंचा,
- तांदूळ, तुळस, बेल, दुर्वा, फुले, पत्री, हार, आंब्याच्या डहाळे
- 2 नारळ, 5 फळे, 25 विड्याची पाने
- कच्चे दूध, दही, शुद्ध तूप, साखर, मध,
- कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, सुटे पैसे.
- चौरंग, आसन, नैवेद्याची तयारी, समई, वाती, निरांजन, कापूर.
- हात पुसण्यासाठी फडके, देवाचे अंग पुसण्यासाठी कापड
- कापसाची वात, चार लहान वाट्या, चंदन, दूर्वा.
गणेश चतुर्थी 2024 पूजा पद्धत
- गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रात:स्नान-संध्या पूजादी नित्यविधी करावेत.
- गणपती मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ करून घ्या.
- पाटावर अक्षता पसराव्यात. यानंतर त्यावर मूर्ती स्थापन करावी.
- ‘श्रीपरमेश्वप्रीत्यर्थ पाथिर्वगणपतिपूजनमहं करिष्ये’ असा संकल्प म्हणून पाणी सोडावं.
- कलश, शंख, घंटा व दीप यांचे पूजन करून गंध, अक्षता, पुष्प अर्पण करावं.
- गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी तूपाचा स्पर्श करावा.
- मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे खालील मंत्र म्हणावेत.
अस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा: क्षरन्तु च।
अस्यै देवत्वम् आचार्यै मामहेति च कश्चन।।
रक्तांभीधिस्थ पोतोल्ल सदरुण सरोजाधि रुढाकराब्जै:।
पाशम् कोदंड भिक्षूद्भवमथ गुणमप्यम् कुशम् पंचबाणान्।।
बिभ्राण असृक्कपालम् त्रिनयन लसिता पीनवक्ष ऊरुहाढ्या।
देवी बालार्क वर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ती: परा न:।।
गणपती बाप्पाला नमस्कार करावा आणि पुढील मंत्र म्हणावा…
एकदंतम् शूर्पकर्णम् गजवक्त्रम् चतुर्भुजम्।
पाशांकुशधरम् देवम् ध्यायेत सिद्धिविनायकम्।।
ध्यायेत देवम् महाकायम् तप्तकांचन संनिभम्।
चतुर्भुजम् महाकायम् सर्वाभरणभूषितम्।।
दंताक्षमाला परशुपूर्ण मोदक हस्तकम्।
मोदकासक्त शुंडाग्रम् एकदंतम् विनायकम्।।
अंत:करणात श्रीगणेश मूर्तीचं ध्यान करून पुढील आवाहन मंत्र म्हणावा…
आवाहयामि विघ्नेश सुरराज आचिर्तेश्वर।
अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थ गणनायक।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। आवाहयामि।।
श्रीगणपतीच्या पायांवर फुलानं पाणी अर्पण करून अर्घ्य मंत्र म्हणावा…
अर्घ्यम् च फलसंयुक्तम् गंधपुष्प आक्षतैर्युतम्।
गणाध्यक्ष नमस्तेस्तु गृहाण करुणानिधे।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। अर्घ्यम् समर्पयामि।।
पळीभर पाण्यात गंध, अक्षता, पुष्प व सुपारी ठेवून त्यातले पाणी फुलानं श्रीगणेशांना अर्पण करावे.
नंतर पंचामृत स्नान मंत्र म्हणावा…
पयो दधि घृतम् चैव मधुशर्करया युतम्।
पंचामृतेन स्नपनम् प्रियताम् परमेश्वर।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। पंचामृत स्नानम् समर्पयामि।।
पंचामृत म्हणजे दूध, दही, तुप, साखर आणि मध एकत्र करून ते फुलानं गणपतीला अर्पण करावं. अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक करावा.
गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्राघनाशन।
एकदंते भवक्त्रेति तथा मूषकवाहन।।
विनायकेश पुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक।
कुमारगुरवे नित्यम् पूजनीया: प्रयत्नत:।।
हे मंत्र म्हणून 21 दुर्वा श्रीगणेशांना अर्पण कराव्या. गणपतीची आरती करावी.
नंतर नैवेद्य दाखवावा. यावेळी खालील मंत्र म्हणावा….
नैवेद्यम् गृह्यताम् देव भक्तिम् मेह्यचलाम् कुरु।
ईप्सितम् मे वरम् देहि परत्र च पराम् गतिम्।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। नैवेद्यम् समर्पयामि।।
पुढील मंत्र म्हणून गणपतीसमोर साष्टांग नमस्कार घालावा.
नम: सर्वहितार्थाय जगदाधार हेतवे।
साष्टांगोयम् प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृत:।।
दररोज सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची आरती करावी. नैवेद्य दाखवावा.