मुंबई ; (Diwali 2024 Marathi) हिंदू धर्मात दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळीच्या सणाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो. या सणाचा उत्साह संपूर्ण देशभरात पाहायला मिळतो. 14 वर्षांचा वनवास भोगून भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतल्याबद्दल दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी धनाची देवी लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की पूजा केल्याने सुख-समृद्धी वाढते आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते. दिवाळीच्या दिवशी दिवे लावण्याला विशेष महत्त्व आहे. चला जाणून घेऊया दिवाळी पूजेच्या शुभ मुहूर्त आणि पुजा विधीबद्दल.
या तारखेला साजरी होणार दिवाळी (Diwali 2024 Date)
पंचांगानुसार, कार्तिक महिन्याची अमावस्या तिथी 31 ऑक्टोबरला दुपारी 3.52 वाजता सुरू होईल. त्याच वेळी, ही तारीख 01 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 06:16 वाजता संपेल. अशा परिस्थितीत, दिवाळी 01 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल.
लक्ष्मी पुजनाचा शुभ मुहूर्त (Lakshmi Pujan Muhurat 2024)
01 नोव्हेंबर रोजी देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 05:36 ते 06:16 पर्यंत आहे. या काळात तुम्ही लक्ष्मी पूजन करू शकता.

लक्ष्मी पूजन विधी (Lakshmi Pujan Vidhi Marathi)
दिवाळी पूजेचे साहित्य
मोली धागा, कुंकू, हळद, नारळ, अक्षत (तांदूळ), लाल कापड, फुलं, 5 सुपारी, लवंग, विड्याची पानं, तूप, कलश, आंब्याची पाने, चौरंग, कमळाचे फुल, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, गंगाजल), फळे, बताशा, पेढे, पूजेला बसण्यासाठी आसन, अगरबत्ती, अत्तर, दिवा, कापूस, आरतीचे ताट, पुजेसाठी पैसे
दिवाळी पूजेची तयारी
दिवाळीत लक्ष्मीपूजन सुरू करण्यापूर्वी गणेश आणि लक्ष्मी बसलेल्या ठिकाणी रांगोळी काढा. तुम्ही जिथे पूजा करत आहात त्या चौरंगाच्या चार कोपऱ्यांवर प्रत्येकी एक दिवा लावा. यानंतर मूर्तीची प्रतिष्ठापना केलेल्या ठिकाणी तांदूळ ठेवावे आणि त्यानंतर लक्ष्मीच्या मूर्ती त्यावर ठेवावी. जर गणपती आणि लक्ष्मी अशा दोन मुर्ती ठेवणार असाल तर गणपतीच्या उजव्या बाजूला लक्ष्मीला ठेवा. त्यांच्यासमोर दोन मोठे दिवे ठेवा, एक तेलाने आणि दुसरा तुपाने भरा. दिवाळीच्या पूजेला कुबेर, सरस्वती आणि काली मातेचीही पूजा केली जाते. त्यांच्या मूर्ती असतील तर त्याही पूजेच्या ठिकाणी ठेवाव्यात.
पूजा विधी
सर्वप्रथम विड्याच्या पानावर एक सुपारी ठेवा. आता ताम्हणात ती सुपारी, नाणे आणि सोनं ठेवा त्याला पाण्याने अभिषेक करा. त्यानंतर पंचामृताने आणि परत पाण्याने अभिषेक करा. सुपारी आणि पैसा विड्याच्या पानावर ठेवा. सोनं त्याच्या बाजूला ठेवा.
लक्ष्मीच्या मुर्तीवर फुलाने पाणी शिंपडा नंतर पंचामृत आणि परत पाणी शिंपडा. देवीला अष्टगंध लावा. हळद कुंकू वाहा. फुलं वाहा आणि हार घाला. कलशाला गंध, फुल अक्षता वाहा. दिव्याला फुलं वाहून नमस्कार करा. लक्ष्मीला पेढ्याचा नैवेद्य दाखवा. गणपती आणि लक्ष्मीची आरती करा. आरतीनंतर घरातील सर्वांना प्रसादाचे वाटप करा.
दिवाळीच्या दिवशी या गोष्टी कराव्या
या दिवशी ताटात पाच दिवे लावावेत. यानंतर हे दिवे घराच्या अंगणात ठेवावे. यानंतर घराच्या वेगवेगळ्या भागात दिवे लावावे.
दिवाळी हा दिव्यांचा सण आणि वाईटावर चांगल्याचा विजय. त्याला दिवाळी असेही म्हणतात. दिवाळी हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. या दिवशी प्रभू राम 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले होते. धनत्रयोदशीपासून दिवाळीचा सण सुरू होतो. यानंतर छोटी दिवाळी याला नरक चतुर्दशी असेही म्हणतात. छोटी दिवाळीनंतर मोठी दिवाळी हा सण साजरा केला जातो. दिवाळी पूजेच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. गोवर्धन पूजेनंतर भाऊबीज सण साजरा केला जाणार आहे. हा उत्सव 5 दिवस चालतो.
दिवाळीचे महत्व
दिवाळीच्या दिवशी प्रभू राम लंका जिंकून अयोध्येला परतले. या दिवसापासून दरवर्षी कार्तिक अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीत लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. तसेच प्रभू रामाच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी दिवे प्रज्वलित केले जातात. मित्र आणि कुटुंबियांसोबत दिवाळीचा सण साजरा करा. या दिवशी फटाक्यांची आतिषबाजीही केली जाते.
दिवाळीच्या दिवसात अनेक जण नवीन व्यावसाय देखील सुरू करतात. ज्यांना नवीन वाहन खरेदी करायचे असते ते धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करतात. परिवारातील सर्व कुटूंब दिवाळीच्या निमीत्त्याने एकत्र येतात. गोड धोड खातात. अनेक ठिकाणी दिवाच्या सुट्ट्या असल्याने फिरायला जाणाऱ्यांची संख्याही अधिक असते.
दिवाळीच्या सणाला स्वच्छतेचे अधिक महत्त्व आहे. दिवाळी येण्याआधी अनेक जण घराची साफसफाई करतात, कारण लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे. स्वच्छता असे जिथे लक्ष्मी वसे तिथे असे म्हणतात. दिवाळीच्या काळात अनेक कंपन्यांमध्ये उपकरणांची पुजा केली जाते. तसेच कर्मचाऱ्यांना सण साजरा करण्यासाठी बोनसही दिला जातो.