मुंबई : (Atul Parchure Death Reason) मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड गेले. ते 58 वर्षांचे होते. अनेक हिंदी आणि मराठी टीव्ही मालिका तसेच चित्रपटांमध्ये त्याच्या भूमिकेसाठी त्यांना ओळखले जाते. अतुल परचुरे हे प्रतिभावान अभिनेते होते, ते गेल्या वर्षभरापासून कर्करोगाशी झुंज देत होते. आज 14 ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
हिंदी मराठी चित्रपटांमध्ये सोडली स्वतःची छाप (Atul Parchure Movie)
या अभिनेत्याने टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये आपली छाप पाडली. ‘आरके लक्ष्मण की दुनिया’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘यम हैं हम’, ‘बडी दूर से आये हैं’, ‘द कपिल शर्मा शो’ आणि अनेक मराठी मालिका तसेच लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये त्यांनी आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले. टीव्ही व्यतिरिक्त, अतूल परचुरे यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्याच्या कॉमेडी आणि कॉमिक टायमिंगमुळे अनेकांच्या मनात त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले होते.
कॅन्सरचे निदान झाल्यानंतर झोप येत नव्हती
अतुल परचुरे यांनी विशेषत: कॉमेडी क्षेत्रात खोलवर प्रभाव टाकला आहे. वृत्तानुसार, गेल्या वर्षी जुलैमध्ये बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी खुलासा केला होता की कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्याला स्वीकारणे सोपे होते. ते म्हणाले होते की, ‘माझ्यामध्ये काहीतरी चूक आहे याची मी मानसिक तयारी केली होती. सकारात्मक दृष्टीकोन राखूनही, काम करू न शकल्याने त्यांची रात्रीची झोप उडाली होती. माझ्या मनात नकारात्मक विचार आलेच नाहीत असे नाही. मी कामावर परत कधी जाईन या चिंतेत अनेक रात्र जागून काढल्या. एकीकडे उत्पन्न थांबले, तर खर्च सुरू झाला आणि कॅन्सरच्या उपचाराचा खर्च खूप वाढला असेही ते म्हणाले.
घरच्यांनी दिला पूर्ण पाठिंबा
त्याच मुलाखतीत, अतूल यांनी सांगितले की, मेडिक्लेमच्या महत्त्वावर देखील भर दिला होता, ज्यामुळे त्यांना आर्थिक भार हाताळण्यास मदत झाली. त्यांनी सांगितले की, ‘मेडिक्लेम सोबतच माझ्या बचतीमुळे माझा उपचार होऊ शकला. मला कधीच नैराश्य वाटले नाही कारण माझ्या कुटुंबाने मला कधीही रुग्णासारखे वागवले नाही. याशिवाय अनेक मित्रांनीही त्यांना आर्थिक मदत देऊ केली मात्र त्यांनी ती नाकारली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला शोक
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आपल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले की,
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एग्झिट : रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी आहे. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली देदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली. नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. तरुण तुर्क म्हातारे अर्क, नातीगोतीसारखी नाटकं असोत किंवा पु. ल. देशपांडे यांचा शाब्दिक, वाचिक विनोद असो, अतुल परचुरे यांनी आपल्या अंगभूत गुणांनी त्यात गहिरे रंग भरले.मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या जाण्यामुळे मराठीतला एक अभिजात अभिनेता हरपला आहे. हे नुकसान भरुन येण्यासारखे नाही. परचुरे यांच्या हजारो चाहत्यांपैकी एक या नात्याने कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो. राज्य सरकारच्या वतीने मी त्यांना श्रध्दांजली वाहतो. ओम शांती.
अमिताभ बच्चन यांच्याकडून सन्मानीत झाले होते
मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल अतुल परचुरे यांना नुकताच मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शतकातील महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांना हा सन्मान दिला होता. यानंतर अतुलनेही एक पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी लिहिले होते- मंगेशकर कुटुंबाचा चाहता म्हणून ओळख आणि प्रेम मिळवण्याचा हा सर्वोच्च मार्ग आहे. श्री अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत हे साध्य करणे हे मी काल रात्री पाहिलेले आणखी एक स्वप्न आहे.
एक अद्भुत संध्याकाळ आणि या सन्मानाबद्दल धन्यवाद.